आयपीएल’चं चांगभलं!
‘इंडियन प्रीमिअर लीग’चा धूमधडाका आजपासून पुन्हा सुरू होत आहे. या
‘क्रिकेट कार्निव्हल’मध्ये म्हणजेच या उत्सवात भाग घेणारे होत्साते
जवळपास तेच आहेत. मालकही तसेच आहेत, फक्त सामन्यांचे
ठिकाण दूर देशी दक्षिण आफ्रिकेत आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या आड येणाऱ्या या ‘आयपीएल-२’ ला
आपला बाडबिस्तरा गुंडाळावा लागून त्याचा मुक्काम या वर्ष
ांपुरता दक्षिण आफ्रिकेत टाकावा लागला आहे. निवडणूक
होत असताना भारतात मर्यादित २०-२० षटकांचे अतिझटपट
सामने होऊ देणे धोक्याचे आहे, त्यांना योग्य ती सुरक्षा
व्यवस्था आपल्याला पुरवता येणे शक्य नाही, असे केंद्रीय
गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितल्यावर ‘आयपीएल’च्या
संयोजकांनी आदळआपट केली, पण त्यांना कुणी धूप घातलानाही. निवडणुकांच्या काळात ‘आयपीएल’चे
सामने भरवणे म्हणजे लोकशाही वर निखारे ठेवणे होय, असे त्याच वेळी स्पष्ट केल्यानंतरही
या सामन्यांमागे असणाऱ्यांनी आपला हट्ट चालू ठेवला. तथापि निवडणूक काळात ही सुरक्षा
व्यवस्था होऊ शकणार नाही, असे अनेक राज्यांनी त्यांना ठणकावले तेव्हा त्यांच्यापुढे
दुसरा पर्याय उरला नाही. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी हे सामने भरवायची तयारी दाखवताच
दक्षिण आफ्रिकेची निवड करण्यात आली. निवडणुकीत मतदानादरम्यान दहशतवादी कुणावरही आणि
कशावरही हल्ला करू शकतात, हे स्पष्ट असल्याने आणि दहशतवाद्यांना या देशात गोंधळ निर्माण
करायचा असल्याने त्यांनी सामन्यांच्या ठिकाणीही आपले अस्तित्व दाखवले असते. परवा मतदानाच्या
पहिल्या फेरीत असे हल्ले झाल्याने १८ जणांना प्राण गमवावे लागले. लाहोरमध्ये दाखल झालेल्या
श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेला दहशतवादी हल्ला ही या धोक्याची निशाणी होती. चिदंबरम
यांनी सामने या काळात होऊ शकणार नाहीत, असे म्हणताच शरद पवार, ललित मोदी यांनी संताप
व्यक्त केला खरा, पण चिदंबरम यांच्या ठामपणापुढे त्यांचा इलाज चालणे अशक्य होते. दक्षिण
आफ्रिकेत आता ‘आयपीएल-२’ गेल्याने त्या खेळाचा मान राखला जाणार आहे. खेळाडूंनाही निश्चिंत
मनाने तिथे खेळता येईल. सामने पाहू इच्छिणाऱ्यांनाही सुरक्षेचा दिलासा मिळेल. ‘आयपीएल’
वर सट्टा खेळणाऱ्या कुणालाही निर्विघ्नपणे तो जगभरात कुठेही लावता येईल. ज्यांना उत्तम
खेळ करून आपल्यावर लावलेल्या पैशाचे चीज करून दाखवायचे आहे, त्यांना ते देशाबाहेरच्या
प्रेक्षकांसमोर दाखवता येईल. भारतीय प्रेक्षक तिथे असणार नाहीत म्हणून आठ संघांमध्ये
विभागलेल्या भारतीय खेळाडूंवर आणि भारतीय प्रेक्षकांवर डोळा ठेवून असलेल्या अन्य देशी
क्रिकेटपटूंनी खट्टू व्हायचे कारण नाही. दक्षिण आफ्रिकेत मूळच्या भारतीय वंशाचे जसे
अनेकजण आहेत, तसेच भारतासह अन्य देशांतून जाणाऱ्यांमध्येही भारतीयांचा समावेश असेल.
सर्वाचे भले व्हावे, ही आपल्या संस्कृतीची देणगी असल्याने आणि भारतीय नावांच्या सर्वच
संघांत विविध देशांचे खेळाडू असल्याने ‘आयपीएल’चे चांगभले पाहायला कुणाच्याच काकांचे
जाणार नाही. पैशाचा व्यापार होईल. भारतात ज्यांना निवडणुकांच्या प्रचारापासून सुटका
करून घ्यायची आहे, त्यांना टीव्हीला डोळे लावून तीन घटकांची आपली करमणूक करवून घेता
येणे शक्य आहे. सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच हे सामने भारतात व्हावेत, असे मनापासून ज्यांना
वाटत होते, त्यांनाही प्रचारातून वेळ काढून आपली सर्वच तरुण पोरे व्यवस्थित खेळतात की
नाही, ते पाहता येईल. या सगळ्यात शरद पवार हे जास्त समाधानी असतील. दक्षिण आफ्रिकेत
सामने गेले हे बरे झाले, असे त्यांच्या निदान एका मनाला वाटत असेल. बहुतेकांना एकाच
वेळी दोन मनांचा हवाला देता येत असला, तरी शरद पवारांच्या मनांची गोष्टच वेगळी आहे.
त्यांच्याबाबतीत ‘असंख्य’ हा शब्दही कमी पडावा, इतक्या मनांचा विचार करावा लागतो, असे
म्हणतात. त्यामुळे त्यांचे एक मन तरी आता क्रिकेटच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानपदासाठीच्या
डावपेचांचा विचार करायला आपल्याला अंमळ वेळ मिळेल, असे म्हणत असले पाहिजे. बाकीची मने
कोणत्या मतदारसंघात कुणाला आणायचे, कुणाला पाडायचे, कुणाविषयी नेमका संदेश कसा आणि कुणामार्फत
द्यायचा, जुळवायचे काय, तोडायचे कसे, फोडायचे कुठे, याचा विचार करत राहतील. शिवाय त्यांच्या
डाव्या हाताचे उजव्या हाताला कळत नसल्याने ‘टीव्ही’चा रिमोट कुणा सहायकाच्या हाती देऊन
ते मोकळे होतील. असो, एकूण काय, तर ‘आयपीएल’ला नवा देश मिळाला आणि तीच ती ढोलबाजी पाहून
कंटाळलेल्यांना नवा विरंगुळाही. गंमत पाहा, ज्या केपटाऊन शहरात उद्घाटनाचा पहिला सामना
आणि अर्थातच सोहळा पार पडतो आहे, त्याला ‘समुद्रावरचे मद्यकेंद्र’ म्हणूनही ओळखण्यात
येते. तिकडे जाऊन सामन्यांचा आनंद घेऊ म्हणणाऱ्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी बऱ्याच
गोष्टी तिथे आहेत. हे शहर किती अलबेले आहे, ते आपण आठ संघांच्या परवाच्या मिरवणुकीत
पाहिलेच आहे. दुतर्फा गर्दी असल्याने आठ संघांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही आपण अगदीच
परदेशी आलो, असे सुने सुने वाटले नसणार. या गर्दीत त्यांच्या त्यांच्या देशवासीयांशी
जुळणारे चेहरेही होते. शिवाय ‘कोलकाता नाईट रायडर्स’चा मालक शाहरुख खान, पंजाबच्या किंग्ज
इलेव्हनची प्रीती झिंटा, ‘राजस्थान रॉयल्स’ची शिल्पा शेट्टी यांच्याखेरीज शिवमणीची तडाखेबाज
ड्रमबाजी हे सारे केपटाऊनवासीयांना तरी नवे होते. ‘कोलकाता नाईट रायडर्स’चा प्रशिक्षक
जॉन बुकानन आणि मालक शाहरुख यांनी त्यांच्या संघासाठी चार कर्णधार निवडावेत की नाही,
हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु सौरव गांगुली तिथे पोहोचताच ब्रेडॉन मॅक् कुलमची त्या
संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. थोडक्यात पाठ वळताच वार करायचा खेळ तिथेही पोहोचला
आहे. ठराविक वेळेत षटके न संपवणाऱ्या संघाला आणि त्याच्या कर्णधाराला या स्पर्धेत जबर
दंडही केला जाणार आहे. त्याचे आकडे पाहिले तर त्या संघाचे दिवाळेच निघेल. असो. दक्षिण
आफ्रिकेशी भारतीयांचे नाते तसेही जुनेच आहे. १८९३ मध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाच्या
तरुण वकिलाने त्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले, तेच मुळी तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची
वकिली करायला. २४ वर्षांच्या त्या तरुणाने जोहानसबर्गचे रेल्वेच्या पहिल्या वर्गाचे
तिकीट काढले खरे, पण पीटरमारित्झबर्ग स्टेशनावर कृष्णवर्णामुळे त्याला सामानासह बाहेर
फेकून देण्यात आले. युरोपियनांसाठी नसणाऱ्या साध्या खोलीत थंड हवामानात कुडकुडत रात्र
काढायचा प्रसंग त्या संवेदनशील तरुणाच्या मनावर कोरला गेला आणि त्यातूनच त्यांनी वर्णद्वेषाविरुद्धचा
आपला लढा प्रखर केला. नामदार गोखले यांना गांधीजींनी लिहिलेली अनेक पत्रे ही दरबान,
केपटाऊन आणि जोहानसबर्गहून आहेत. सांगायचा मुद्दा हा, की गांधीजींपुरता सत्याग्रह या
शब्दाचा उगमही त्याच परिसरातला. आज या दक्षिण आफ्रिकेत अनेक देशांचे कृष्णवर्णीय, श्वेतवर्णीय
खेळाडू एकाच वेळी एकेका संघाकडून खेळणार आहेत. वर्णद्वेष्टय़ांच्या हातात दक्षिण आफ्रिकेची
सत्ता असताना केपटाऊन हे शहरच वर्णद्वेषाच्या विरोधातल्या चळवळीचे केंद्र होते आणि तिथूनच
११ फेब्रुवारी १९९० रोजी नेल्सन मंडेला या महामानवाचे अनेक वर्षांच्या अटकेनंतरचे पहिले
भाषण झाले. घराच्या गच्चीत उभे राहून केलेले त्यांचे ते भाषण चिरस्मरणीय होते. वर्णद्वेष्टय़ा
दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळायला बंदी असताना काही गोऱ्या खेळाडूंनी तिथे खेळून जागतिक बंदी
ओढवून घेतली होती, आता ती राजवट गेली, वर्णद्वेष संपला, तशी ती बंदीही उरली नाही. केपटाऊन
शहराला ‘मदर सिटी’ किंवा ‘गुड होप’ म्हणूनही ओळखण्यात येते. आजपासून तिथे आणि अन्यत्र
जे सामने चालणार आहेत, त्यात बऱ्याच गमतीजमती होतील. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एखाद्या
सुंदर तरुण चेहऱ्याला बॉलिवूडमध्ये कदाचित शाहरुख खानबरोबर काम करायची संधीही दिली जाणार
आहे. सर्वार्थाने चांगली वाटावी अशी ही सर्कस तीन आठवडे आपली मनसोक्त करमणूक करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या सामन्यांचे तिकीट दर हे दक्षिण आफ्रिकेच्याच नागरिकांच्या
खिशाला परवडतील, असेच नव्हेत, तर ते तुमच्या-आमच्या खिशालाही परवडतील, म्हणजे रुपयांमध्ये
७० पासून एक हजापर्यंत आहेत. विमानाचे तिकीट म्हणाल, तर ते मात्र प्रत्येकाने आपल्या
पाकिटावर अवलंबून ठेवायला हवे. नाही तर आपल्या घरातल्या टीव्हीची वाहिनी तरी गेला बाजार
कुठे जात नाही. शिवाय इथे राहून पाहायचा फायदा हा की एकाच वेळी अनेकांच्या सल्ल्यांसह
आपल्याला खेळाचाही आनंद लुटता येईल. ‘आयपीएल’चा झेंडा केपटाऊनच्या वाळवंटी आज रोवला
जातो आहे आणि त्याचवेळी आपल्याला मतदानाच्या दुसऱ्या फेरीचीही चिंता वाहायची आहे. तूर्त
सर्वाचेच जय हो, ‘आयपीएल’वाल्यांचेही जय हो!