ना शिवसेना हरली, ना मी अपराधी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेनेची हार झालेली नाही; फक्त आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही हे वास्तव आहे. आम्ही जनतेसाठी निवडणूक लढविली; कुठल्याही व्यक्तिगत स्वार्थासाठी लढलो नाही. कार्यकारी प्रमुख म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारी माझी आहे; पण मी कुठला गुन्हा व अपराध केलेला नाही. त्यामुळे मी कोणाचा गुन्हेगार नाही, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

 

विधानसभेत शिवसेनेची दाणादाण उडाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चार दिवस मौन धारण केले होते. त्यांनी कुठल्याही प्रसिद्धिमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नव्हती. शिवसेना भवनात आज त्यांनी आपले मौन सोडले. ते म्हणाले, ""पक्षात जेथे आवश्‍यक आहे, तेथे बदल होणार आहेत; तसेच शिवसेनेच्या पराभवाला संघटनेचे जे पदाधिकारी जबाबदार आहेत, मग ते कोणीही असो, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. जेथे हिंदुत्वाची गरज आहे, तेथे हिंदुत्व आणणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

 

शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाही; परंतु मतदारही कॉंग्रेसच्या विजयाचा आनंद लुटताना दिसत नाही; उलट या विजयाचा सन्नाटा आहे. आम्ही जनतेच्या प्रश्‍नांसाठी निवडणूक लढविली होती. त्यांनी आम्हाला साथ दिली नाही तरीही डगमगण्याचे कारण नाही. आम्ही पुन्हा एकदा नवीन फौज घेऊन मैदानात उतरू, असे मनोगत ठाकरे यांनी व्यक्त केले.

 

निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले, शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाही; पण त्यानंतर तीन दिवस आमच्याविरोधात वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून येत होते. त्यामुळे पहिले हे शाब्दिक फुटू दे व मी नंतर बोलीन, असे ठरविल्यामुळे आजचा दिवस निवडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या नेतृत्वावर कोणी प्रश्‍न उठविला, असा प्रतिसवाल करतानाच "ज्यांनी सवाल उठविले, ते माझ्यासोबत नव्हते' असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले, ""जनतेची लढाई म्हणून मी निवडणूक लढलो; पण दुर्दैवाने अपयश आले. त्यामुळे यंदा संधी हुकली; पण हार झालेली नाही. मी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाईन आणि त्यांच्याशी संवाद साधेन.

 

शिवसेनाप्रमुखांनी "सामना'मध्ये मराठीबद्दल व्यक्त केलेली तळमळ योग्य आहे. त्यांनी आपले आयुष्य मराठी व हिंदुत्वासाठी समर्पित केल्यामुळे त्यांनी ही तळमळ व्यक्त केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

"विरोधी पक्षनेतेपदावरून वाद नाही'

 

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून कुठलाही वाद नाही. योग्य व्यक्तीची निवड करण्यात येईल. विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून परस्पर सामंजस्याने मार्ग काढू. जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडणारा असा आमचा विरोधी पक्षनेता असेल, असेही त्यांनी सांगितले.

 

मिलिंद नार्वेकरांना क्‍लीन चिट

 

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तिकीटवाटपासंदर्भात झालेल्या आरोपांबद्दल उद्धव यांना प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, की नार्वेकर हा काही कार्यकारी प्रमुख नाही. उद्धव ठाकरे कार्यकारी प्रमुख आहेत. तसेच आमचे विजयी आमदार येथे उपस्थित आहेत. तुम्हीच त्यांना विचारू शकता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज ठाकरेंना टोला

 

"निवडणुकीत अपयश आले; पण आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी लढलेलो नाही, असे सांगतानाच ""कुणाचा करिष्मा असो वा नसो; आम्ही कधी करिष्मा व करिनाच्या फंदात पडत नाही. आम्ही शोबाजी केली नाही. जनतेच्या प्रश्‍नावर आम्ही रस्त्यावर उतरलो; स्वतःसाठी आंदोलने केली नाहीत'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता मारला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोणता फडका फडकला हे महत्त्वाचे नाही; पण भगवा उतरल्याचे दुःख आहे, असे स्पष्ट करतानाच विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्याचा कुठलाही वाद नव्हता; तर पक्षातील वाद होता, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

 

Tuesday, October 27, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp414ed96e.png
wpa5f00279_0f.jpg