नागपुर -
शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या ताकदीबाबत अवास्तव अंदाज बांधले होते, अशी टीका भाजपच्या 'मनोगत' या मुखपत्रात झाल्याने शिवसेना व भाजपमधील संबंध बिघडण्याची चिन्हे असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी मात्र परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत, 'मुखपत्रातील मत हे पक्षाचे मत नाही', असा खुलासा रविवारी केला.
विधानसभा निवडणुकीतील भाजपची कामगिरी चांगली होती, असे प्रशस्तीपत्र या मुखपत्रातून देण्यात आले आहे. त्याचवेळी शिवसेनेला फटका बसल्याचा दावाही केला आहे. शिवसेनेला अडचणीत आणणारा हा लेख मुखपत्रातून प्रकाशित झाल्यावर सेनेच्या नेत्यांकडून नाराजीही व्यक्त झाली.
या पार्श्वभूमीवर रविवारी प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी, हे मत पक्षाचे नसून ते मुखपत्रातील स्तंभलेखकाचे असल्याचे म्हटले आहे. लेखातील भूमिका ही भाजपची अधिकृत भूमिका नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे युतीचे नेतृत्व करीत असून आमचा त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. याच आधारावर आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेेऊ, असेही त्यांनी सांगितले.
Monday, November 16, 2009
यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल



