लखनौ - भाजपमध्ये परतण्याचे कल्याणसिंहांचे संकेत

लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी स्वगृही अर्थात, भारतीय जनता पक्षात परतण्याचे संकेत दिले आहेत. "कल्याणसिंहांना समाजवादी पक्षात कधीच घेतले जाणार नाही,' या मुलायमसिंह यांच्या घोषणेनंतर काही तासांतच कल्याणसिंह यांनी भाजपविषयी पुन्हा एकदा सहानुभूती व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा राजवीरसिंह यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडत असल्याचे आज जाहीर केले.

मुलायमसिंह यांच्या जाहीर घोषणेनंतर कल्याणसिंह यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. ""आपण समाजवादी पक्षात येण्याचे मुलायमसिंह यांचे निमंत्रण कधीच स्वीकारलेले नाही. भविष्यातही तसे करणार नाही,'' असे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबर भाजपशिवाय दुसरा कोणताच पक्ष अयोध्येत राममंदिर उभारणार नाही, असे सांगत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोंजारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कटिबद्ध असून, आपल्याला तेथे मंदिर झालेले पाहायला आवडेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आपण आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असून, हिंदुत्वाच्या माध्यमातूनच देशाचा विकास होऊ शकतो. हिंदू शक्तींना बलवान बनविण्याची गरज आहे; तसेच त्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे कल्याणसिंह म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलायमसिंह यांच्या जाळ्यात आपण अडकलो होतो, अशी कबुली देत समाजवादी पक्षाबरोबरच्या अकरा महिन्यांच्या घरोब्यादरम्यान तेथे कोणतीही संधी दिसली नसल्याचे त्यांनी सांगितले. मला पक्षात घ्या, असे कधीही म्हटले नव्हते. मुलायमसिंह आणि अमरसिंह यांनीच आपल्या दारात येऊन पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते; मात्र आपण नकार दिल्यानंतर त्यांनी राजवीरसिंहला पक्षात येऊ द्यावे, असे विनंती केली होती. समाजवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी आठ जागा आपल्या व्यक्तिगत प्रभावामुळे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

Monday, November 16, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp78551c9d.png
wpca64e321_0f.jpg